आजरा शहरात चोरट्यांचा हैदोस,भरदिवसा तीन घरफोड्या; १४.५ लाखांचे दागिने व दुचाकी लंपास


आजरा शहरात चोरट्यांचा हैदोस,भरदिवसा तीन घरफोड्या; १४.५ लाखांचे दागिने व दुचाकी लंपास:-

जि.कोल्हापूर, ता.आजरा:दि. 22 जून :-आजरा शहरातील शिवकॉलनी, गांधीनगर रोड परिसरात चोरट्यांनी भरदिवसा धुमाकूळ घालत तीन ठिकाणी घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटे ४ ते सकाळी ११ या कालावधीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोरट्यांनी निवृत्त प्राध्यापक डॉ. नवनाथ शिंदे यांच्या घराला लक्ष्य करत तब्बल १४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर ऐवज लंपास केला. याप्रकरणी प्रकाश नवनाथ शिंदे (रा. शिवकॉलनी, गांधीनगर रोड, आजरा) यांनी आजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून प्रवेश
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंब काही कामानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली.

श्वानपथक निष्फळ; दुचाकीवरून पसार झाल्याचा अंदाज
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते; मात्र चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही. चोरी केलेल्या मोटारसायकलवरूनच आरोपी पसार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या धाडसी घरफोडीमुळे आजरा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!