शिवथर गावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण :-


शिवथर गावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण :-

जि.सातारा, ता. शिवथर :दि. 24 जून :-शिवथर गावातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात दूषित आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे पाणी पिल्यानंतर अनेक नागरिकांना पोटदुखी, उलट्या, जुलाब, ताप यांसारखे त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नळांना येणारे पाणी पूर्णपणे गढूळ असून ते पिण्यास अयोग्य आहे. तरीही प्रशासनाकडून पर्यायी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी वापरण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या परिस्थितीचा सर्वाधिक फटका महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत असून गावात आरोग्य धोक्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित ग्रामपंचायत, पाणीपुरवठा विभाग आणि आरोग्य यंत्रणा केवळ पाहणी व आश्वासनांपुरती मर्यादित राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

“नागरिक आजारी पडत असताना प्रशासन निष्क्रिय का?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. दूषित पाण्याची तातडीने तपासणी का करण्यात आली नाही? स्वच्छ पाण्याची व्यवस्था का उभी करण्यात आली नाही? तसेच दोषींवर कारवाई का होत नाही? असे प्रश्न आता तीव्र होत आहेत.

ग्रामस्थांनी गावातील जलस्रोत, पाण्याची टाकी आणि पाइपलाइन यांची तातडीने तांत्रिक तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून दूषित पाण्याचे नेमके कारण शोधावे आणि नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे. शिवथर गावातील हा प्रश्न केवळ पाणीपुरवठ्याचा नसून थेट नागरिकांच्या आरोग्य आणि जीविताशी संबंधित असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!