कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेहाची वाहतूक; अमळनेरमधील प्रकारामुळे संताप, चौकशीचे आदेश


कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेहाची वाहतूक; अमळनेरमधील प्रकारामुळे संताप, चौकशीचे आदेश

अमळनेर (जळगाव): जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर एका मृतदेहाची वाहतूक थेट नगरपरिषदेच्या कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीतून स्मशानभूमीकडे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनानंतर मृतदेह नेण्यासाठी योग्य शववाहिका उपलब्ध न झाल्याने कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाचा वापर करण्यात आला. हा प्रकार समोर आल्यानंतर नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी या घटनेची पुष्टी करत तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत संबंधित ठेकेदार किंवा जबाबदार व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच आवश्यक असल्यास संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
या घटनेमुळे मृत व्यक्तीच्या सन्मानाबाबत प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित होत असून, भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548129


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!