ठाणे पोलिसांची मोठी कारवाई: ३९ कोटींचे अमली पदार्थ तळोजा येथे नष्ट!
ठाणे: देशभरात सुरू असलेल्या ‘नशामुक्त भारत अभियानाला’ बळ देत ठाणे पोलीस आयुक्तालयाने एक मोठी कारवाई केली आहे. २६ जून रोजी असणाऱ्या ‘जागतिक अमली पदार्थ विरोधी दिना’चे औचित्य साधून पोलिसांनी तब्बल ३९.०३ कोटी रुपये किमतीचे आणि सुमारे ६०० किलो वजनाचे जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट केले आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण ११२ गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल होता. केंद्र सरकारच्या कायदेशीर निर्देशांचे पालन करत हा साठा पूर्णपणे नष्ट करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण
ठाणे पोलीस आयुक्त मा. श्री. आशुतोष डुंबरे यांनी या अमली पदार्थांचा नाश करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्रीय मुद्देमाल नाश समितीचे अध्यक्ष तथा पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मा. डॉ. श्री. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय १) मा. श्रीम. मिना मकवाना, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मा. श्री. विनय घोरपडे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व त्यांच्या पथकाने सर्व कायदेशीर सोपस्कर आणि नियमांची पूर्तता केली.
नवी मुंबईत विल्हेवाट
जप्त करण्यात आलेला हा सर्व धोकादायक मुद्देमाल मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी, तळोजा एम.आय.डी.सी. (नवी मुंबई) येथे नेऊन कायदेशीर प्रक्रिया पाळत सुरक्षितपणे नष्ट करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे मोठे कंबरडे मोडले असून, नशामुक्त समाजासाठी पोलिसांनी एक सकारात्मक पाऊल टाकले आहे.
पत्रकार सिंथिया कोरिया








