वटपौर्णिमेला वडाच्या फांद्यांची अवैध तोड थांबवा; प्रशासनासह महिलांनीही पुढाकार घेण्याची गरज


वटपौर्णिमेला वडाच्या फांद्यांची अवैध तोड थांबवा; प्रशासनासह महिलांनीही पुढाकार घेण्याची गरज

पुणे: वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सणाच्या निमित्ताने मात्र अनेक ठिकाणी वडाच्या झाडांच्या फांद्या बेकायदेशीरपणे तोडून बाजारात विक्रीसाठी आणल्या जात असल्याचे चिंताजनक चित्र दिसून येत आहे. पर्यावरणप्रेमी आणि सुजाण नागरिकांनी या प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शहरांमधील मुख्य बाजारपेठा, चौक आणि रस्त्यांच्या कडेला वडाच्या मोठ्या फांद्या विक्रीसाठी ठेवल्या जात असल्याचे दिसून येते. अनेक महिला सोयीसाठी किंवा जवळ वडाचे झाड उपलब्ध नसल्याच्या कारणाने या फांद्या विकत घेतात. मात्र या वाढत्या मागणीमुळे मोठ्या प्रमाणावर वडाच्या झाडांची छाटणी आणि फांद्यांची तोड होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वडाचे झाड हे दीर्घायुषी, सावली देणारे आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे वृक्ष मानले जाते. अशा झाडांच्या फांद्या सणाच्या नावाखाली तोडल्या जाणे ही निसर्गासाठी वेदनादायी बाब असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.

तातडीने मोहिमेची गरज

स्थानिक महापालिका, पोलीस प्रशासन आणि वन विभागाने वटपौर्णिमेपूर्वी विशेष गस्त घालून वडाच्या फांद्या तोडणारे आणि त्यांची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

महिलांना आवाहन

गेल्या काही वर्षांत शहरातील विविध भागांमध्ये महापालिका, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वडाची झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे महिलांनी बाजारातून तोडलेल्या फांद्या विकत घेण्याऐवजी आपल्या परिसरातील जिवंत वडाच्या झाडाची पूजा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. धार्मिक भावना जपत पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे.

धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखत वटपौर्णिमेचा खरा संदेश जपण्याची वेळ आता आली आहे. प्रशासनाने अवैध फांद्या विक्रीवर कठोर प्रतिबंध घालावा आणि नागरिकांनीही जागरूकता दाखवून अशा विक्रीला प्रोत्साहन देणे टाळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

— पत्रकार उमेश कुलकर्णीमो. 9822548429


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!