सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा:-


सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा:-

जि. कोल्हापूर, ता.कुरुंदवाड:दी. 28 जून :-सैनिक टाकळी येथील गायरान जमिनीवर प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प उभारण्याच्या हालचालींविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

गावातील गट क्रमांक १३५० व ११९४ मधील गायरान जमीन ही सार्वजनिक मालमत्ता असून ती गावाच्या विकासासाठी राखीव असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. मात्र स्थानिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मागणीनुसार येथे एमआयडीसी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.

ग्रामस्थांनी सांगितले की, रोजगारनिर्मितीचे आश्वासन देत सैनिक टाकळी गावाची सैनिकी परंपरा संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. “विकास करायचाच असेल तर सैनिक स्कूल, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, क्रीडांगण आणि माजी सैनिक निवासी संकुल यांसारखे प्रकल्प राबवावेत,” अशी मागणी करण्यात आली.

परिसराला दरवर्षी महापुराचा फटका बसत असल्याचे सांगत, बस्तवाड, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, दानवाड आणि टाकळी या गावांच्या स्थलांतरासाठी ही गायरान जमीन उपयोगी पडते, असे ग्रामस्थांनी नमूद केले. तसेच पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठीही ही जमीन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

प्रस्तावित एमआयडीसी परिसरातील शेतकऱ्यांनी नदीतून पाणी आणून लाखो रुपये खर्च करून शेती विकसित केली आहे. अशा ठिकाणी उद्योग प्रकल्प उभारल्यास हवा व पाणी प्रदूषणामुळे शेती आणि स्थानिक उद्योग धोक्यात येतील, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

एमआयडीसीसाठी प्रस्तावित ४७ हेक्टर जमीन अपुरी असून भविष्यात आणखी जमिनी संपादित करण्याचा धोका असल्याचाही आरोप करण्यात आला. या प्रकल्पामुळे परिसरातील आरोग्य, पर्यावरण, शेती आणि सामाजिक समतोल बिघडेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!