मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे वाचले चिमुकलीचे प्राण:-
जि. जळगाव, ता. भुसावळ:दी. 28 जून :-भुसावळ विभागातील ओढा रेल्वे स्थानक परिसरात मानवतेचा प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. स्थानक परिसरात उभ्या असलेल्या मालगाडीच्या १३ क्रमांकाच्या डब्यात एका नवजात बालिकेला कपड्यात गुंडाळून सोडून देण्यात आल्याचे आढळून आले. रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि एमएसएफ (MSF) जवानांच्या सतर्कतेमुळे बालिकेचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे नियमित गस्तीदरम्यान आरपीएफ कॉन्स्टेबल योगेश गावड आणि एमएसएफ कर्मचारी प्रशांत जगताप हे रात्री गस्ती वर असतांना पहाटे सुमारे 2.45 ला उभ्या असलेल्या मालगाडीची तपासणी करत असताना एका डब्यातून नवजात बालकाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने शोध घेतल्यानंतर मालगाडीच्या डब्यात कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत नवजात बालिका आढळली.
यानंतर जवानांनी तत्काळ रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी , जी. आर.पी , तसेच चाईल्डलाईन प्रतिनिधींना माहिती दिली. बालिकेला सुरक्षित बाहेर काढून तातडीने भुसावळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर बालिकेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले
रेल्वे सुरक्षा दलाच्या “ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत ” करण्यात आलेल्या या उल्लेखनीय कार्यामुळे , रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परता , सतर्कता आणी कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे
या घटनेनंतर नवजात बालिकेला अशा अमानुष पद्धतीने मालगाडीच्या डब्यात कोण आणि का सोडून गेले, याचा शोध रेल्वे पोलीस व संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.
आरपीएफचे कॉन्स्टेबल योगेश गावड आणि एमएसएफ कर्मचारी प्रशांत जगताप यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका निष्पाप चिमुकलीचे प्राण वाचले असून, त्यांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.









