स्मार्ट मीटरचा झटका! वीज बिलात भरमसाठ वाढ झाल्याने मटण मार्केट MSEB कार्यालयावर नागरिकांचा तीव्र हल्लाबोल!..
सोमेश मुळे जळगाव : स्मार्ट मीटरच्या संशयास्पद कारभारामुळे वीज बिलांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, त्रस्त नागरिकांचा संयम अखेर सुटला आहे. “स्मार्ट मीटरमुळे वीज बिल कमी होईल” या शासनाच्या दाव्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. मीटरचे युनिट्स अतिशय वेगाने धावत असल्याने नागरिकांना हजारो रुपयांचे बिल आणि सोबत अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागत आहे. या अन्यायाविरोधात आज विविध भागांतील संतप्त नागरिकांनी एकत्र येत मटण मार्केट येथील MSEB उपविभागीय कार्यालयावर (Sub-office) धडक दिली आणि तीव्र आंदोलन केले.
आंदोलनकर्त्यांनी अत्यंत संतप्त होऊन प्रशासनाला जाब विचारला की, घरात मोजकीच उपकरणे असतानाही एका महिन्याचे युनिट्स अचानक २०० ते ५०० च्या पटीत कसे काय वाढत आहेत? जुन्या मीटरच्या तुलनेत हे नवीन स्मार्ट मीटर दुप्पट-तिप्पट वेगाने फिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सामान्य कुटुंबांना जिथे आधी १ ते २ हजार रुपये बिल येत होते, तिथे आता थेट ६,००० ते १०,००० रुपयांपर्यंत बिले येत आहेत.
दंडाच्या रकमेमुळे संतापात भर
एककीकडे वाढीव बिलांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना, महावितरणकडून थकीत बिलांवर आणि इतर कारणांवरून मोठा दंड (Penalty) आकारला जात आहे. “एकतर बिल चुकीचे आहे, आणि त्यावर पुन्हा दंड कशासाठी भरायचा?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आधीच महागाईने होरपळलेल्या जनतेला या वीज बिलांच्या सुलतानी संकटाने रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले आहे.
आज सकाळपासूनच परिसरातील विविध भागांतील महिला आणि पुरुष नागरिक मटण मार्केट जवळील MSEB उपविभागीय कार्यालयाबाहेर जमा झाले. नागरिकांनी हातात वाढीव वीज बिलांच्या प्रती घेऊन महावितरण प्रशासनाचा तीव्र निषेध केला. “स्मार्ट मीटर हटाओ, सर्वसामान्य वाचवा”, “अन्यायी वीज बिल रद्द करा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता कार्यालयाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
* मीटरची तपासणी: सध्या बसवलेले सर्व स्मार्ट मीटर सदोष असून त्यांची तातडीने त्रयस्थ संस्थेकडून (Third Party) तपासणी करण्यात यावी.
* वाढीव बिले रद्द करा: ६,००० ते १०,००० रुपयांची आलेली बोगस बिरे तात्काळ मागे घेऊन ती दुरुस्त करावीत.
* दंड वसुली थांबवा: बिलांवरील अन्यायकारक दंड पूर्णपणे माफ करण्यात यावा.
* जुने मीटर परत द्या: नागरिकांची फसवणूक करणारे हे स्मार्ट मीटर काढून पूर्वीचेच मीटर पुन्हा बसवण्यात यावेत.
आंदोलनाची वाढती तीव्रता पाहून MSEB च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांचे निवेदन स्वीकारले. “नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली जाईल आणि ज्या मीटरमध्ये तांत्रिक बिघाड किंवा गतीचा प्रश्न आहे, त्यांची तपासणी करून बिले दुरुस्त केली जातील,” असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, ठोस कारवाई न झाल्यास यापुढील आंदोलन अधिक तीव्र असेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.






