जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा अहवाल सात दिवसांत सादर करापालकमंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश; दुरुस्तीचा निधी अखर्चित राहिल्यास अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणार
जालना, प्रतिनिधी/महेंद्र बेराड, दि. २ सप्टेंबर २०२६ : जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, कंपाऊंड वॉल आदी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा सद्यस्थिती अहवाल ७ सप्टेंबरपर्यंत सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
जिल्ह्यातील शाळांच्या दुरुस्ती आणि नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासह शैक्षणिक सुविधांचा आढावा पालकमंत्री मुंडे यांनी मंत्रालयीन दालनातून घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया, जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतींची सद्यस्थिती, आवश्यक दुरुस्ती, उपलब्ध निधी आणि प्रलंबित कामांचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. निधी मंजूर असूनही निविदा किंवा प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने निधी अखर्चित राहणे स्वीकारले जाणार नाही. अशा प्रकरणांत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आदर्श शाळांसाठी सर्वांगीण सुविधा
शाळांच्या डिजिटलायझेशनसाठी उपलब्ध निधीतून रंगरंगोटी, आवश्यक दुरुस्ती, बालस्नेही सजावट, डिजिटल वर्गखोल्या, दर्जेदार बाके, पुस्तके आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे मुंडे यांनी सांगितले. शाळांच्या भिंतीवरील चित्रे आणि संदेश विद्यार्थ्यांमध्ये समता, सामाजिक सलोखा, सर्वसमावेशकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे असावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
शाळांमधील मैदाने वापराविना पडून राहू नयेत. उपलब्ध मैदानांवर आवश्यक सुविधा निर्माण करून खो-खो, कबड्डी, मल्लखांब आणि बॅडमिंटनसारख्या खेळांना प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आदर्श शाळांमध्ये वाचनालय, किचन गार्डन, हरित कुंपण, वृक्षारोपण, सीसीटीव्ही आणि अखंडित वीजपुरवठ्यासह डिजिटल शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
नगरपालिका शाळा आणि ग्रंथालयांचाही आढावा
जालना महानगरपालिका हद्दीतील १६ शाळांसाठी विद्यार्थी संख्या, इमारतींची स्थिती आणि वंचित वस्त्यांचा विचार करून सुधारणा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आधुनिक ग्रंथालयांमध्ये स्वतंत्र अभ्यासिका, संगणक-लॅपटॉप, ऑनलाइन मार्गदर्शन आणि संशोधनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
‘जालनाई सिल्क’च्या ब्रँडिंगवर भर
जालना जिल्ह्यातील रेशीम उत्पादनांना स्वतंत्र बाजारपेठीय ओळख मिळवून देण्यासाठी ‘जालनाई सिल्क’चे प्रभावी ब्रँडिंग करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्याची ओळख निर्माण करणारी तीन ते पाच वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन विकसित करावीत. यामध्ये मोसंबी, स्थानिक स्थापत्यशैली, दगडी जाळी आणि अजिंठा कलाशैलीपासून प्रेरित घटकांचा वापर करण्याची शक्यता तपासावी, असे निर्देश देण्यात आले.
उत्पादनाची गुणवत्ता, कच्चा माल, विणकामाचा खर्च, कारागिरांची मजुरी, किंमत आणि विक्री व्यवस्था यांचा समावेश असलेला व्यवसाय आराखडा तयार करून सुरुवातीला मध्यमवर्गीय ग्राहकांना परवडणारी दर्जेदार उत्पादने बाजारात आणावीत, अशा सूचनाही पंकजा मुंडे यांनी दिल्या.





