साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई; सहाय्यक आयुक्तांसह ४ अधिकारी निलंबित
मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने तातडीने कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणात सहाय्यक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून संबंधित कंत्राटदाराविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (२ जुलै) दुपारी खैरानी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच साकीनाक्यातील या दुर्घटनेने मुंबईतील नागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या प्रकरणात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. तसेच, कामातील निष्काळजीपणाबद्दल संबंधित कंत्राटदाराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास सुरू असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548129




