लंडनमधील सावरकर स्मारकासाठी हिंदू महासभेचे नितीन गडकरींना साकडे; समिती स्थापन करण्याचे आश्वासन
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असलेले लंडनमधील ऐतिहासिक इंडिया हाऊस शासनाने विकत घेऊन तेथे सावरकरांचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी हिंदू महासभेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत गडकरी यांनी या विषयावर लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात येईल, तसेच स्मारकाच्या उभारणीसाठी विशेष समिती स्थापन करण्याबाबत आवश्यक प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
हिंदू महासभेचे प्रतिनिधी नितीन शुक्ल, आदिती जोशी, विवेक परदेशी आणि विद्या घटवाई यांनी गडकरी यांची भेट घेऊन स्मारकाचा प्रस्ताव, कायदेशीर बाबी आणि पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा केली. लंडनमधून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीनंतर लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींना जपणारे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्याच्या प्रयत्नांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429




