मुसळधार पावसाचा तडाखा; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
नवी मुंबई | प्रतिनिधी :
गेल्या २४ तासांपासून नवी मुंबईसह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामानाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने गुरुवार, ३ जुलै रोजी दुपारच्या सत्रात भरणाऱ्या सर्व शासकीय आणि खासगी शाळांना तातडीने सुट्टी जाहीर केली आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून, सर्व शाळांना त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सकाळच्या सत्रातील वर्ग सुरू असल्याने त्या विद्यार्थ्यांना शाळेतून घरी पाठवताना विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या पालकांच्या किंवा अधिकृत प्रतिनिधींच्या ताब्यातच सुरक्षितपणे सोपवावे, असे स्पष्ट निर्देश शाळा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि नागरिकांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






