रावेत–किवळे परिसरात १२ ते १४ तास वीजपुरवठा खंडित; एमएसईबी कार्यालयाबाहेर नागरिकांचे ठिय्या आंदोलन
रावेत : रावेत, किवळे आणि परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये काल रात्रीपासून तब्बल १२ ते १४ तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने हजारो नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. दीर्घकाळ वीज न आल्याने संतप्त नागरिकांनी स्थानिक नेते राजेंद्र तरस आणि नगरसेविका तरस यांच्या नेतृत्वाखाली रावेत येथील महावितरण (एमएसईबी) कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान जबाबदार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत ठोस आश्वासन द्यावे, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत योग्य उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला होता.
रावेत विकास नगर, किवळे, मुकाई चौक, चंद्रभागा कॉर्नर, संकेश्वर विला, आकाश राज, बीआरटी रोड परिसरातील सोसायट्या, पेंडसे कॉलनी, टी.सी. कॉलनी तसेच इतर भागांमध्ये वीजपुरवठा खंडित राहिला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागला.
आंदोलनादरम्यान राजेंद्र तरस यांनी महावितरणच्या कारभारावर टीका करत, नागरिक नियमित वीजबिले भरत असतानाही त्यांना दीर्घकाळ अंधारात ठेवणे अयोग्य असल्याचे सांगितले. ही केवळ विजेची समस्या नसून नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण स्पष्ट करून तो पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








