वाढीव वीज बिलामुळे नागरिक हवालदिल; वसईतील महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
वसई : वाढीव वीज बिलाच्या त्रासाला कंटाळून एका नागरिकाने महावितरणच्या कार्यालयात स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वसई येथे घडली. या प्रकारामुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
अजय कुमार त्रिपाठी (रा. उमेळमान, वसई) असे संबंधित नागरिकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरात स्मार्ट मीटर बसविल्यानंतर त्यांना तब्बल १४ हजार रुपयांहून अधिक वीज बिल आले. वाढीव बिलाबाबत त्यांनी महावितरणकडे वारंवार तक्रार केली होती. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, थकीत बिलाच्या कारणावरून घराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे संतप्त आणि हताश झालेल्या त्रिपाठी यांनी महावितरण कार्यालयात जाऊन स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
कार्यालयातील कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने हस्तक्षेप करून त्यांना रोखले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर त्रिपाठी यांना उपचारासाठी सर डी. एम. पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर महावितरण प्रशासनाने संबंधित घराचा वीजपुरवठा पुन्हा सुरू केला असून, वाढीव वीज बिलाच्या तक्रारीची मीटर तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे स्मार्ट मीटर, वाढीव वीज बिले आणि ग्राहकांच्या तक्रारींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








