वळसंग श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल’च्या २००५ सालच्या बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; २१ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा!


‘वळसंग श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल’च्या २००५ सालच्या बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; २१ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा!

वळसंग : येथील नामांकित ‘श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल’च्या सन २००५ मधील दहावीच्या बॅचचे भव्य स्नेहसंमेलन (Get-together) आज शाळा परिसरामध्ये अत्यंत उत्साहात आणि भावुक वातावरणात संपन्न झाले.शाळा सुटल्यानंतर तब्बल २१ वर्षांनी सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणी एकत्र आल्याने संपूर्ण परिसर जुन्या आठवणींनी प्रफुल्लित झाला होता.कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली.

या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले २००५ सालचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी आपल्या शालेय जीवनातील गमतीजमती,शिक्षकांचा धाक आणि वर्गखोलीतील सुख-दुःखाचे क्षण या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे माजी शिक्षक,चालू मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची लाभलेली वंदनीय उपस्थिती. आपल्याला ज्ञानाचे धडे देऊन आयुष्यात सक्षम घडवणाऱ्या गुरुवर्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी चालू मुख्याध्यापक काकतिकर सर आणि माजी मुख्याध्यापक कसबे सर यांच्यासह पाटील सर, पवार सर, चौगुले सर, टेंगले सर, चव्हाण सर, माने सर, एस. एम. माळी सर, एस. एल. माळी सर, डी. पी. माळी सर आणि पाटील मॅडम यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार केला. तसेच शाळेच्या काळातील लाडके शिपाई दर्याप्पा नाईक व उमेश नाईक यांचाही विशेष सन्मान करून जुन्या ऋणानुबंधांना उजाळा देण्यात आला. २१ वर्षांनंतर आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी झालेले पाहून सर्व शिक्षकांनी अभिमान व्यक्त केला व आशीर्वाद दिले.

केवळ आनंद साजरा न करता,आपल्या मातृभूमीचे आणि शाळेचे ऋण फेडण्यासाठी या बॅचच्या वतीने शाळेच्या प्रगतीसाठी आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सामाजिक संकल्पही करण्यात आले.दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात स्नेहभोजन,जुन्या गाण्यांची मैफल आणि सामूहिक छायाचित्रे (Group Photos) काढण्यात आली. “वय वाढले आणि जबाबदाऱ्या बदलल्या तरी आमची मैत्री, शिक्षकांबद्दलचा आदर आणि या शाळेच्या आठवणी आजही तशाच आहेत,”अशी भावना सर्व मित्रांनी व्यक्त केली. शेवटी, दरवर्षी एकत्र येण्याचा निर्धार करून आणि एकमेकांचा निरोप घेताना सर्वांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते.
प्रतिनिधी :- संजय कोळी.जत
७८७५९०३७७७.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!