अतिवृष्टीचा एसटी प्रवाशांना फटका; मुंबई-पुणे शिवनेरीच्या फेऱ्या पुढील सूचनेपर्यंत रद्द
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या घटनेमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा थेट फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवनेरी बस सेवेला बसला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत एसटी महामंडळाने मुंबई-पुणे मार्गावरील शिवनेरीच्या सर्व फेऱ्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवासासाठी निघालेल्या शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली असून अनेकांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.
दरड हटविण्याचे आणि मार्ग सुरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्यानंतरच शिवनेरी सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी एसटी प्रशासनाकडून मिळणारी अद्ययावत माहिती तपासावी तसेच आवश्यक नसल्यास प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






