शित्तूर वारूण येथे सशस्त्र धाडसी दरोडा; आई-मुलाला बेदम मारहाण करत ७९ हजारांचा ऐवज लंपास:-


शित्तूर वारूण येथे सशस्त्र धाडसी दरोडा; आई-मुलाला बेदम मारहाण करत ७९ हजारांचा ऐवज लंपास:-

जि. कोल्हापूर, ता. शाहूवाडी: दी. 6 जुलै :-शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर वारूण येथील पाटीलवाडीमध्ये मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकत परिसरात खळबळ उडवून दिली. या दरोड्यात रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे ७९ हजार १२३ रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. दरोडेखोरांनी घरातील आई-मुलाला बेदम मारहाण केल्याने दोघेही जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दादा रामचंद्र पाटील हे ग्रामपंचायतीत क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री ते त्यांच्या आई आनंदी पाटील यांच्यासह घरी होते. तर त्यांचे वडील रामचंद्र पाटील हे नेहमीप्रमाणे शेतावर गेले होते.

रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास आनंदी पाटील या काही कारणास्तव घराबाहेर गेल्या होत्या. त्या परत घरात येत असताना हातात काठ्या, गज आणि इतर हत्यारे घेतलेल्या अंदाजे २५ ते ३० वयोगटातील आठ दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला.

घरात शिरताच काही दरोडेखोरांनी आनंदी पाटील यांना घेरले, तर इतरांनी दादा पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरोडेखोरांनी दादा पाटील यांच्या खिशातील ९ हजार १२३ रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. तसेच आनंदी पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले.

दरोडेखोर अल्टो आणि स्विफ्ट या दोन चारचाकी वाहनांमधून आले होते. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी दागिने आणि मौल्यवान वस्तूंचा शोध घेत लूटमार केली. विरोध केल्याने आई-मुलाला पुन्हा मारहाण करण्यात आली.

दरम्यान, संधी साधून दादा पाटील यांनी घराच्या मागील दरवाजातून बाहेर पडत शेजाऱ्यांकडे धाव घेतली आणि आरडाओरडा करून मदत मागितली. त्यांचा आवाज ऐकताच परिसरातील तरुण तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांची चाहूल लागताच दरोडेखोरांनी हाताशी लागलेला ऐवज घेऊन सोडोलीच्या दिशेने पलायन केले.

स्थानिक तरुणांनी दरोडेखोरांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. तसेच शित्तूर वारूण, शिराळे खेडे, सोडोली आणि मालेवाडी परिसरातील युवकांनाही तातडीने माहिती देण्यात आली. काही ठिकाणी वाहनांचा अडथळा निर्माण करून दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दरोडेखोरांनी गाड्या थेट गावकऱ्यांच्या दिशेने घातल्याने त्यांना माघार घ्यावी लागली आणि दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले.

घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, पोलीस उपनिरीक्षक परशुराम सिरसाठ आणि अतुल सोनुले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या धाडसी दरोड्यामुळे शाहूवाडी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून पोलिसांनी गस्त वाढवावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!