पवई तलावाजवळील रहिवासी भागात घुसलेल्या मगरेला सुरक्षित पकडले
मुंबई : पवई तलावालगतच्या मोरारजी नगर परिसरातील एका दर्ग्याजवळ सुमारे सात फूट लांबीची मगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मगर दिसताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संयुक्तपणे नियोजनबद्ध कारवाई करत कोणतीही इजा न होता मगरेला सुरक्षितपणे पकडले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मगरेची वैद्यकीय तपासणी सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
या घटनेमुळे काही काळ परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार सिंथिया कोरिया मुंबई






