भोसरी-आळंदी रोड परिसर तीन दिवसांपासून अंधारात; महावितरण अधिकारी नॉट रिचेबल, नागरिकांचा संताप
भोसरी, पुणे : भोसरी-आळंदी रोड परिसरातील हनुमान कॉलनी, हुतात्मा चौक, जय महाराष्ट्र चौक आदी भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुरुवातीला मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला असावा, असा समज नागरिकांनी करून घेतला. मात्र सलग तीन दिवस उलटूनही वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या तक्रार केंद्रावर वारंवार संपर्क साधून तक्रारी नोंदवल्या. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच संबंधित महावितरण अधिकारी “नॉट रिचेबल” असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.
वीजपुरवठा नसल्याने घरातील अन्नपदार्थ खराब होत असून फ्रीज बंद असल्यामुळे दूध, भाजीपाला व इतर नाशवंत वस्तू खराब झाल्या आहेत. मोबाईल चार्ज करता येत नसल्याने नागरिकांना संपर्क साधण्यातही अडचणी येत आहेत. महागाईच्या काळात खराब झालेला भाजीपाला फेकून देण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
या समस्येबाबत स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये चार नगरसेवक असूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांनी महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा तसेच जबाबदार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी केली आहे.
पत्रकार विजय अडसूळ






