घोडबंदर रोडवर भीषण अपघात; गॅस टँकर रिक्षावर पलटला, चालक आणि प्रवाशाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
ठाणे:घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील डी मार्टसमोर आज दुपारी १२:४५ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. एक भरधाव गॅस टँकर थेट रिक्षावर पलटल्याने झालेल्या या अपघातात रिक्षा चालक आणि एका प्रवाशाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवासी प्रवास करत होते. गॅस टँकर रिक्षावर पलटल्याने रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या दुर्घटनेत रिक्षा चालक दशरथ राणाजी पवार (वय- वर्षे, रा. २८८, जय भीम नगर, मुंबई-पुणे रोड, जांभळी नगर, कळवा) आणि रिक्षामधील प्रवासी मोहम्मद अमीन (रा. मोहम्मद फाशी अली मशीद जवळ, सरालगंज, उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात अमजित अन्सारी हे प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी ओवळा येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टँकर बाजूला करून रस्ता मोकळा केला. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
पत्रकार सिंथिया कोरिया मुंबई






