मुंबईकरांना मोठा दिलासा! BMC च्या ‘OC अभय योजने’ला विस्तार; मंजूर नकाशा असलेल्या सर्व इमारतींना लाभ, पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार गती


मुंबईकरांना मोठा दिलासा! BMC च्या ‘OC अभय योजने’ला विस्तार; मंजूर नकाशा असलेल्या सर्व इमारतींना लाभ, पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील रखडलेल्या इमारती आणि पुनर्विकास प्रकल्पांबाबत राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेने (BMC) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ‘OC अभय योजना’ अधिक व्यापक करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मंजूर नकाशा (Sanctioned Plan) असलेल्या सर्व निवासी इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate – OC) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या योजनेतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे निवासी इमारतींसाठी पूर्वी लागू असलेली ८० चौरस मीटरची जाचक अट रद्द करण्यात आली आहे. आता महापालिकेकडून मंजूर नकाशा असलेल्या सर्व निवासी इमारतींना ओसी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हजारो घरमालक आणि रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आजपर्यंत ओसी नसल्यामुळे अनेक रहिवाशांना महानगरपालिकेच्या कारवाईची भीती, मालमत्तेच्या व्यवहारांतील अडचणी तसेच गृहकर्ज मिळवताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. आता ओसी मिळाल्यानंतर फ्लॅट किंवा मालमत्तेची खरेदी-विक्री, हस्तांतरण, नोंदणी तसेच बँकांकडून गृहकर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
या योजनेचा लाभ केवळ निवासी इमारतींपुरता मर्यादित नसून, आवश्यक असलेली सर्व वैधानिक ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) सादर केल्यानंतर व्यावसायिक इमारतींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे व्यापारी वर्गालाही मोठा दिलासा मिळणार असून, व्यावसायिक क्षेत्रातील अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
मंजूर नकाशा असलेल्या इमारतींना ओसी मिळण्याचा मार्ग खुला झाल्यामुळे मुंबईतील गृहनिर्माण, पुनर्विकास आणि रिअल इस्टेट क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, हजारो नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यास या निर्णयाची मोठी मदत होणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!