तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! मुंबईतील प्रसिद्ध ‘रुस्तम अँड कंपनी’ आईस्क्रीमचा परवाना निलंबित; १६ ठिकाणी एफडीएची धडक कारवाई
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरातील प्रसिद्ध ‘रुस्तम अँड कंपनी’ आईस्क्रीम दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत दुकानाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.
एफडीएच्या तपासणीदरम्यान दुकानात स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आले. तपासणी पथकाला दुकानाच्या परिसरात उंदीर आणि माशांचा वावर आढळल्याने ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत संबंधित परवाना निलंबित केला.
याच मोहिमेअंतर्गत एफडीएने मुंबईतील आणखी १६ ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. विविध खाद्य प्रतिष्ठानांमध्ये स्वच्छता, अन्नसुरक्षा नियमांचे पालन आणि परवान्यांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबईतील प्रतिष्ठित खाद्यपदार्थ विक्रेत्यावर झालेल्या या कारवाईमुळे खाद्य व्यवसाय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429







