‘मी थांबणार नाही, उडवून जाणार’; आळंदीत वाहतूक कोंडीदरम्यान महिलेचा राडा, बॅरिकेड्सला कारची धडक
आळंदी | प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान आळंदीतील पीसीएस चौकात वाहतूक व्यवस्थेदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. पालखी सोहळ्यासाठी रस्ते बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका महिला कार चालकाने पोलिसांशी वाद घालत पोलीस बॅरिकेड्सला कारची धडक दिल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामावर जाण्यास उशीर होत असल्याचे सांगत संबंधित महिलेने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव पुढे जाण्यास नकार दिल्यानंतर महिलेने संताप व्यक्त करत, “मी थांबणार नाही, उडवून जाणार,” असे म्हणत कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी तिच्या कारची पोलीस बॅरिकेड्सला धडक बसली. त्यानंतरही तिने प्रतिबंधित मार्गावर वाहन चालवण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. घटनेबाबत पुढील कायदेशीर कारवाई आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429.






