आधुनिक ‘नॅटग्रीड’ तंत्रज्ञानाच्या मदतीने चार महिन्यांनंतर बेवारस मृताची ओळख पटली; दौंड रेल्वे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पुणे (प्रतिनिधी): रेल्वे स्थानक परिसरात आजारी अवस्थेत आढळलेल्या एका बेवारस वृद्धाची तब्बल चार महिन्यांनंतर अत्याधुनिक ‘नॅटग्रीड’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ओळख पटवून त्याच्या कुटुंबीयांपर्यंत माहिती पोहोचविण्यात दौंड लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. या संवेदनशील आणि तांत्रिक तपासामुळे तमिळनाडूमधील एका कुटुंबाला आपल्या बेपत्ता झालेल्या वडिलांचे सत्य समजले असून, पोलिसांच्या या कार्याबद्दल कुटुंबीयांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ मार्च २०२६ रोजी भिगवण रेल्वे स्थानकावर सुमारे ७२ वर्षीय एक अनोळखी वृद्ध गंभीर आजारी अवस्थेत आढळून आला होता. रेल्वे पोलिसांनी तातडीने त्याला भिगवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी त्याला बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. उपचारादरम्यान वृद्ध केवळ “नारायण स्वामी” एवढेच आपले नाव सांगू शकत होता. मात्र त्याला स्वतःचा पत्ता, कुटुंबीय किंवा अन्य कोणतीही माहिती आठवत नव्हती. अखेर उपचार सुरू असतानाच दि. ८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८.५४ वाजता त्यांचे निधन झाले.
मृताची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मृताचे छायाचित्र सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले. लोहमार्ग जिल्ह्यातील तसेच शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांना तपास याद्या पाठविण्यात आल्या. मृताचे बोटांचे ठसे घेऊन ते राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पाठविण्यात आले. डीएनए प्रोफाइलही जतन करण्यात आले. याशिवाय विविध व्हॉट्सॲप समूहांवरही मृताची माहिती प्रसारित करण्यात आली. मात्र या सर्व प्रयत्नांनंतरही मृताच्या नातेवाईकांचा कोणताही मागमूस लागला नाही.
यानंतर दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस हवालदार उमेश कोंगे यांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. त्यांनी मृताचे छायाचित्र आणि माहिती अत्याधुनिक ‘नॅटग्रीड’ प्रणालीवर अपलोड केली. कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल डेटाबेसच्या साहाय्याने कार्य करणाऱ्या या प्रणालीने मृत व्यक्तीचा फोटो तमिळनाडूमधील एका व्यक्तीच्या नोंदीशी जुळवून दिला. त्यानुसार मृताची ओळख नारायणस्वामी चिन्नास्वामी (वय ७२), रा. आर.आर. नगर, नरसिंहनायकनपालयम, ता. कोईमतूर, जि. कोईमतूर (तमिळनाडू) अशी निश्चित झाली.
यानंतर दौंड रेल्वे पोलिसांनी पेरीयानाईकनपालयम पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. तेथील पोलिसांनी संबंधित पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता प्रदीपकुमार एन. (वय ३६) यांनी छायाचित्रातील व्यक्ती आपले वडील असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, वडील बेपत्ता झाल्याप्रकरणी त्यांनी दि. ८ एप्रिल २०२६ रोजी मिसिंग क्रमांक २२६/२०२६ असा गुन्हा देखील नोंदविला होता.
या माहितीनंतर दि. ९ जुलै २०२६ रोजी प्रदीपकुमार एन., त्यांचे बंधू व पत्नी दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी त्यांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली तसेच नारायणस्वामी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणीही नेले. ही माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. त्यांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या संवेदनशील व तांत्रिक तपासाचे कौतुक केले.
ही उल्लेखनीय कारवाई राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे, विशाल गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे, रवींद्र गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी राजेंद्र गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. बी. आहेर, आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार उमेश कोंगे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून बेवारस मृताची ओळख पटविण्याची ही कारवाई रेल्वे पोलिसांच्या तपासकौशल्याची आणि संवेदनशीलतेची प्रचिती देणारी ठरली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429







