फळवणीतील घटनेचा निषेध; लोहार समाजाचे आंदोलन, गावकऱ्यांनी व्यक्त केली दिलगिरी.


फळवणीतील घटनेचा निषेध; लोहार समाजाचे आंदोलन, गावकऱ्यांनी व्यक्त केली दिलगिरी.

टाकळीभान, प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील फळवणी येथे अंत्यसंस्काराच्या वेळी घडलेल्या वादग्रस्त प्रकाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या लोहार समाजाच्या पदाधिकारी व समाजबांधवांनी मंगळवारी (दि. १४ जुलै) ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करून निषेध नोंदविला.

तुळसाबाई पांडुरंग लोहार यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारावेळी घडलेल्या घटनेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. याप्रकरणी संबंधितांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान अंकुश थोरात, यशवंत आबा कळसाईत, महेश लोहार, शिवाजी कळसे, सागर लोहार, दादासाहेब कळसाईत आणि दिलीप वसव यांनी आपली भूमिका मांडली. समाजावर अन्याय झाल्यास संपूर्ण राज्यातील लोहार समाज एकत्रितपणे लढा उभारेल, असा इशाराही वक्त्यांनी दिला. तसेच “जिथे गाव तिथे स्मशानभूमी” ही योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी महिलांशी गैरवर्तन झाल्याचा आरोप करत काही पोलिसांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदन दिल्याची माहिती दिलीप वसव यांनी दिली.

दरम्यान, फळवणीचे विद्यमान सरपंच, पोलीस पाटील आणि माजी सरपंच सचिन पाटील यांनी आंदोलनकर्त्यांसमोर गावाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. “गावात घडलेला प्रकार दुर्दैवी असून त्याबद्दल आम्हाला खेद आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही, याची दक्षता घेतली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही बाजूंची मते ऐकल्यानंतर उपस्थित समाजपदाधिकारी आणि ग्रामस्थांनी चर्चा करून हे प्रकरण सामंजस्याने याच ठिकाणी थांबविण्याचा निर्णय घेतला. यापुढे कोणतीही अतिरिक्त तक्रार किंवा कायदेशीर कारवाई न करण्याचेही सर्वानुमते ठरले.

बैठकीनंतर समाजबांधवांनी जालिंदर लोहार यांच्या निवासस्थानी एकत्र येऊन समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा केली. भविष्यात समाजातील कोणावरही अन्याय झाल्यास एकजुटीने लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या आंदोलनात दिलीप वसव, अर्जुन टिंगरे, शिवाजी कळसे, सागर लोहार, दादासाहेब कळसाईत, यशवंत आबा कळसाईत, राजेश चव्हाण, बाबासाहेब सासणे, अंकुश थोरात, महेश लोहार, आकाश लोहार यांच्यासह सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांतील विविध लोहार समाज संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी:  दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!