टाकळीभानची ग्रामसभा ,बसस्टॅंड, यात्रा अन्नसुरक्षा यादी, दारू बंदी या मुद्द्यावर वादळी ठरली

टाकळीभान(प्रतिनिधी)—श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ग्रामपंचायतची ग्रामसभा दि.१९ आॅगस्ट रोजी पार पडली. रेशन, दारू बंदी,बसस्टॅंड, यात्रा अन्नसुरक्षा यादी यामुद्याभोवती तब्बल तीन तास सुरू असलेल्या या ग्रामसभेत शाब्दीक चकमक होवून याचे रूपांतर जोरदार खडाजंगीत झाले. परिणामी अपेक्षीत मुद्द्यावर सुटसुटीत चर्चा होणे गरजेचे होते. मात्र तसे न होता कुणाचाच कुणाला ताळमेळ लागेना. फक्त आरडाओरड, धांगडधिंग्यातच सदर ग्रामसभा वेगळ्या दिशेने भरकटली जावून कुठलीही साधक बाधक चर्चा न होता गदारोळातच गुंडाळली गेली. सुरूवातीला ग्रामसेवक भिंगारदे यांनी केलेले अहवाल वाचन तसेच तीन चार वक्त्यांचे पाच ते सात मिनिटांचे मनोगत वगळता संपूर्ण ग्रामसभा ही गदारोळातच पार पडली. अनेकांना आपले प्रश्न मांडण्यास संधीही मिळाली नाही. संपूर्ण पाच वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या कारभाराचे जसे चित्र ग्रामस्थांनी अनूभवले त्यास साजेशी अशीच ही शेवटची ग्रामसभा ठरली असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती.
सतरा सदस्य असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतची ग्रामसभा ही बुधवार दि.१९ रोजी पार पडली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच कान्हा खंडागळे हे होते. यावेळी व्यासपिठावर राहुल पटारे, राजेंद्र कोकणे, सुप्रिया धुमाळ, भास्करराव कोकणे, अनिल बोडखे, नारायण काळे, शाखाअभियंता गरगडे, यशवंत रणनवरे, तलाठी रूपाली रामटेके, संजय रणनवरे, राजेंद्र कोकणचे,आदी उपस्थित होते. या सदस्यमंडळाची ही शेवटची ग्रामसभा असल्याने ग्रामस्थांना विकासकामासंदर्भात साधक बाधक व तपशीलवार चर्चा होईल याबद्दल कमालीची उत्सूकता होती. मात्र या सर्व बाबींचा भ्रमनिरास होऊन फक्त आणी फक्त मनोरंजनाचा खेळच गावकर्यांना अनूभवयास मिळाला.
ग्रामसेवक भिंगारदे हे अहवाल वाचन करत असतानेच त्यांना काही जणांकडून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाला. जलदगतीने अहवाल वाचन आटोपून भिंगारदे हे बाजुला झाले. तद्दनंतर भास्करराव कोकणे यांनी गेल्या पाच वर्षातील ग्रामपंचायतीच्या कारभारावर ताशेर ओढले. या सदस्य मंडळाने कुठलाही विकास केला नसून फक्त आणी फक्त गलीच्छ राजकारण केले. त्यामुळे अशा गलिच्छ राजकारण करणार्या जिनसा परत निवडून देवू नका असे आवाहन करून या ग्रामसभेतून काढता पाय घेतला. अनिल बोडखे यांनी अन्नसुरक्षा योजनेबद्दल प्रश्न उपस्थित केले. तसेच आपल्या परिवाराच्या नावाच्या समावेशाचा उल्लेख कसा झाला? याबद्दल विचारणा केली असता तुम्ही मागणी केल्याशिवाय नाव येत नाही असे उत्तर कान्हा खंडागळे यांनी दिल्याने काही वेळ या दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. ग्रामपंचायत कर्मचार्यांचा पगार वाढविणे तसेच बाजारचा लिलाव रद्द करून कर्मचार्यामार्फत बाजारची वसूली करण्याची मागणी बोडखे यांनी केली. बापूसाहेब शिंदे यांनी यावेळी अतिक्रमण नियमानूकूल करावे व घरकुलांचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, अन्यथा ग्रामपंचायत पुढे मी उपोषणास बसेल असा इशारा दिला. गरज नसताने येथील व्यावसायीकांचे थोडेफार असलेले अतिक्रमण काढू नये. नाहक व्यापार्यांना त्रास देवू नये असे मत रामभाऊ आरगडे यांनी मांडले. संजय रणनवरे यांनी बसस्टॅंडचा प्रश्न येथील गावपुढार्यांना सोडविता येत नसेल तर ना.राधाकृष्ण विखे पाटील, आ.हेमंत ओगले यांच्यापुढे मी कैफीयत मांडणार असल्याचे सांगून स्टॅंडपरिसरात महिलांसाठी मुतारी बांधण्यात यावी अशी मागणी केली.
यानंतर सुप्रिया धुमाळ म्हणाल्या की, मुली व महिला या गावात सुरक्षीत नाही. याचा दस्तूरखुद्द अनूभव मला स्वत:ला आला आहे. त्याचबरोबर टाकळीभान ग्रामपंचायचातीच्या मागील काही वर्षापूर्वीच्या सदस्य मंडळाबाबतच्या कारभाराबाबत तसेच यात्रेतील आॅर्केस्टा कार्यक्रम व ग्रामपंचायत जागा नावावर होण्याबाबत प्रश्न विचारताच जोरदार खडाजंगीस सुरूवात झाली. यावेळी त्यांना उत्तर देताने उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की, जुन्या सदस्य मंडळाने काय केल? याबद्दल तुम्ही आम्हांला का विचारता? त्याबद्दल आम्हांला माहीती नाही. तसेच यात्रेबद्दलचा संपूर्ण निर्णय हा यात्राकमिटीचा असून त्यात आमचा संबध नाही. यात्रेत तमाशा व इतर कार्यक्रम हे यात्रेचे अविभाज्य घटक असून त्याशिवाय यात्रेला शोभा नसल्याचे सांगीतले. तसेच यात्रेत लोककलेचे कार्यक्रम ठेवायचे की नाही याबाबत ग्रामस्थांना विचारणा केली. यावेळी मोठ्याप्रमाणात गदारोळ उडाला. तब्बल तीन तासामधील जवळपास दोन अडीच तास याच गदारोळात ही ग्रामसभा पार पडली. ११ वाजेच्या दरम्यान सुरू झालेली ग्रामसभा दोन अडीचच्या सुमारास संपली. याप्रसंगी अनेकांना प्रश्न मांडायचे होते. काही वक्त्यांना बोलायचे होते. मात्र या गदारोळामुळे त्यांना आपले विषय न मांडताच जावे लागले.
याप्रसंगी सुधिर मगर, अनिल दाभाडे, आप्पासाहेब रणनवरे, भाऊसाहेब पटारे, अनिल कोकणे, शामवेल खरात, सोमनाथ आरगडे, अक्षय कोकणे, मल्हार रणनवरे, बाबासाहेब तनपुरे, विशाल पटारे, कानीफनाथ जाधव, प्रभाकर रणनवरे, दगडू गायकवाड, एकनाथ पटारे, मधूकर गायकवाड आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर





