नाशिकमध्ये कारने चिरडून मैत्रिणीची हत्या; अपघाताचा बनाव उघड, आरोपी अटकेत
नाशिक :नाशिकच्या वाडीवऱ्हे परिसरात रिसॉर्टबाहेर झालेल्या वादातून ३४ वर्षीय विवाहित महिलेची कारने चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुपाली पाटील असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या परिचितानेच ही हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली पाटील आणि आरोपी दीपक सैंदाणे यांच्यात रिसॉर्टबाहेर वाद झाला. या वादातून संतापलेल्या दीपकने रुपाली यांच्या अंगावर कार घातल्याचा आरोप आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार अपघात असल्याचा बनाव केल्याचे तपासात समोर आले. मात्र, वाडीवऱ्हे पोलिसांनी उपलब्ध पुरावे आणि घटनाक्रमाच्या आधारे तपास सुरू केला. चौकशीत पोलिसांसमोर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दीपक सैंदाणे याला अटक केली असून, हत्येमागील नेमके कारण, दोघांमधील संबंध आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429





