जळगावच्या गोलाणी मार्केटमध्ये आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर: ‘🅒’ विंगच्या तळमजल्यावर साचतेय पाणी; मनपा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष!
सोमेश मुळे जळगाव:
शहराचे मध्यवर्ती केंद्र आणि व्यापारी हृदय समजल्या जाणाऱ्या गोलाणी मार्केटमधील ‘🅒’ विंग सध्या एका मोठ्या नागरी आणि आरोग्य समस्येचा सामना करत आहे. येथील तळमजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली असून, टाकी भरली की पाणी थेट (डायरेक्ट) खाली जमिनीवर कोसळत आहे. हे पाणी तळमजल्यावरील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात साचत असल्यामुळे संपूर्ण परिसरात कमालीची दुर्गंधी आणि रोगराईचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
शेवाळे आणि डासांचा सुळसुळाट
टाकीतून ओव्हरफ्लो होणारे पाणी सतत साचून राहत असल्यामुळे तळमजल्याच्या फरशांवर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणावर शेवाळे पसरले आहे. यामुळे येण्या-जाणाऱ्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पाय घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, या साचलेल्या संथ पाण्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियासारख्या जीवघेण्या आजारांचे जंतू पसरवणाऱ्या डासांची पैदास वेगाने होत आहे. येथील व्यापारी आणि खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
व्यापारी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप
गोलाणी मार्केटमध्ये दररोज हजारो नागरिक खरेदीसाठी येतात. मात्र, ‘🅒’ विंगच्या तळमजल्यावरील या विदारक परिस्थितीमुळे ग्राहकांनी या भागाकडे फिरकणे कमी केले आहे, ज्याचा थेट फटका स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला बसत आहे. “दुर्गंधी आणि डासांमुळे दुकानात बसणे असह्य झाले आहे. मनपा कर वसूल करते, मग या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष का?” असा संतप्त सवाल स्थानिक व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे.
या गंभीर समस्येकडे जळगाव महानगरपालिकेच्या (मनपा) संबंधित स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि वरिष्ठ प्रशासनाने तातडीने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता, पाण्याच्या टाकीला ऑटोमॅटिक कट-ऑफ स्विच बसवणे किंवा ओव्हरफ्लो पाईपची योग्य जोडणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, साचलेले पाणी उपसून त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी आणि ब्लिचिंग पावडर टाकण्याची मागणी जोर धरत आहे. एखादी मोठी साथ पसरण्यापूर्वी मनपा प्रशासन जागे होऊन कारवाई करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






