कर्तव्यापलीकडची माणुसकी; अंध विद्यार्थ्याला पोलिसांचा मदतीचा हात
पुणे : कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या अनेक घटना समोर येतात. पुण्यातही अशीच एक संवेदनशील घटना घडली असून, मुंबईहून पुण्यात आलेल्या अंध विद्यार्थ्याला पोलिसांनी मदतीचा हात देत त्याचा पुढील प्रवास सुरक्षित केला.
मुंबईहून पुण्यात आलेला अंध विद्यार्थी मोहमद सुफियान शेख अनिस हा आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी पुण्यात आला होता. मात्र, परिसराची माहिती नसल्याने तसेच अंधत्वामुळे त्याला नेमके कुठे जायचे आणि तेथे कसे पोहोचायचे, याबाबत अडचण निर्माण झाली. त्यामुळे तो काही काळ संभ्रमात आणि अडचणीच्या परिस्थितीत होता.
यावेळी त्याची अडचण पोलिसांच्या लक्षात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक खोपीकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमरदीप साळुंके आणि पोलीस हवालदार हनुमंत बोराटे यांनी त्याची आस्थेने विचारपूस केली. विद्यार्थ्याची परिस्थिती समजून घेत पोलिसांनी त्याला धीर दिला आणि त्याच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी केवळ मार्गदर्शन करून न थांबता विद्यार्थ्याला आर्थिक मदतही केली. त्यानंतर त्याला कोंढवा येथे जायचे असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याच्यासाठी रिक्षाची व्यवस्था केली. विद्यार्थ्याला स्वतः रिक्षात सुरक्षितपणे बसवून देत त्याचा पुढील प्रवास सुरक्षित होईल, याचीही पोलिसांनी काळजी घेतली.
या संपूर्ण घटनेत पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि माणुसकी विशेष कौतुकास्पद ठरली आहे. अडचणीत सापडलेल्या एका दिव्यांग विद्यार्थ्याला केवळ पोलीस म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून मदतीचा हात देत त्याला सुरक्षितपणे त्याच्या गंतव्यस्थळी रवाना करण्यात आले.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांच्या ब्रीदवाक्यासोबतच समाजातील गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी पुढे येण्याची ही भावना निश्चितच प्रेरणादायी आहे. पोलिसांच्या या माणुसकीपूर्ण कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548129







