डोंबिवलीतील डॉक्टर-नर्सेसवरील हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर IMA चा २४ तासांचा संप; पुण्यातील डॉक्टरही सहभागी


डोंबिवलीतील डॉक्टर-नर्सेसवरील हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर IMA चा २४ तासांचा संप; पुण्यातील डॉक्टरही सहभागी

पुणे | प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
डोंबिवली येथील महापालिका रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने महाराष्ट्रभर २४ तास नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात पुणे जिल्ह्यातील सुमारे १० हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत.
हा संप २० जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून २१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात खाजगी रुग्णालये, दवाखाने आणि क्लिनिकमधील नियमित ओपीडी सेवा तसेच नियोजित उपचार बंद राहतील.
मात्र, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग (ICU), अपघातग्रस्त रुग्णांवरील उपचार, प्रसूती सेवा आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू राहतील, असे आयएमएने स्पष्ट केले आहे.
डोंबिवलीतील हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
या संपामुळे नियमित तपासण्या, ओपीडी सेवा आणि नियोजित शस्त्रक्रियांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधूनच भेटीचे नियोजन करावे, असे आवाहन आयएमएकडून करण्यात आले आहे.

 


46
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!