सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रभानजी सुरडकर यांचे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन
जि. प. उच्च प्राथमिक शाळा पारध बु. येथे प्रेरणादायी कार्यक्रम; स्पर्धा परीक्षा, शिस्त व व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शन
पारध, (प्रतिनिधी- महेंद्र बेराड) दि. २१ जुलै :
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पारध बु., केंद्र – पिंपळगाव (रे.), ता. भोकरदन येथे इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर नियोजन आणि स्पर्धा परीक्षांविषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. सुधाकर चंद्रभानजी सुरडकर (सहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणे), रा. पद्मावती (ता. भोकरदन) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी, शिस्त, वेळेचे नियोजन, व्यक्तिमत्त्व विकास, व्यसनमुक्त जीवन आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. “मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण परिश्रम करा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी श्री. प्रकाश सिनकर (ठाणे अंमलदार, पोलीस स्टेशन पारध) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री. रामेश्वर हातकडके होते. अध्यक्षीय समारोपात त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार, सामाजिक जबाबदारी, शिस्त आणि प्रामाणिकपणा जोपासून आपल्या पालकांचे, शाळेचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमास शिक्षक श्री. डी. बी. सोनुने, श्री. डी. डी. वैराळकर, श्री. एस. एस. माळोदे, श्री. एस. एम. सावळे, श्री. जे. एम. पेटकर, श्रीमती पी. एस. तडवी, श्रीमती एस. एस. जाधव व श्रीमती जे. के. तबडे तसेच इयत्ता ५ वी ते ८ वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबत जागरूकता निर्माण झाली. उपस्थितांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करून अशा कार्यक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.






