पीसीएमसीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली; पालक-विद्यार्थ्यांमध्ये संताप


पीसीएमसीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली; पालक-विद्यार्थ्यांमध्ये संताप
पिंपरी-चिंचवड :
मार्च २०२५ मध्ये एसएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम अद्याप त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अनेक महिने उलटूनही शिष्यवृत्तीचे वितरण न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थी आणि पालकांच्या म्हणण्यानुसार, शिष्यवृत्ती वितरणातील विलंबामागे कोणतेही ठोस किंवा समाधानकारक कारण प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप केला जात आहे.
सुरुवातीला नगरसेवकांची निवडणूक कारण पुढे करण्यात आले. त्यानंतर एसआरए, जनगणना तसेच इतर प्रशासकीय कामांचा दाखला देत शिष्यवृत्ती वितरणाची प्रक्रिया सतत पुढे ढकलण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मात्र, या कारणांचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसत असून त्यांच्या शैक्षणिक गरजा आणि पुढील शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदतीवर परिणाम होत आहे.
शिष्यवृत्ती हा विद्यार्थ्यांचा हक्क असून ती वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने याप्रकरणी तातडीने भूमिका स्पष्ट करून रखडलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात तत्काळ जमा करावी, अशी जोरदार मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

प्रतिनिधी अभिजित कुलकर्णी


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!