सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला
नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. गुरुद्वारा माता साहिब देवाजी, मुगट परिसरात दर्शनासाठी गेलेल्या बादल यांच्यावर हल्लेखोराने अचानक वार केला. या हल्ल्यात बादल यांच्या हाताला दुखापत झाली. हल्लेखोराला पोलिसांनी घटनास्थळावरच ताब्यात घेतले.
हल्ल्याच्या वेळी सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान दाखवत बादल यांच्या दिशेने होणारा पुढील वार रोखला. हल्लेखोराला आवरण्याच्या प्रयत्नात केंद्रे हे स्वतः जखमी झाले. त्यांच्या या धाडसी हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर सुखबीर सिंह बादल यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचे वृत्त आहे. हल्ल्याचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली असून सुरक्षाव्यवस्थेचाही आढावा घेतला जात आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया




