उत्कर्ष मतिमंद संकुलात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा; ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग! .
सोमेश मुळे जळगाव (पिंप्राळा): आषाढी एकादशीचे औचित्य साधून पिंप्राळा येथील उत्कर्ष मतिमंद संकुलात भव्य आणि भक्तीमय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विठू नामाच्या गजराने आणि टाळ-मृदुंगाच्या नादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे संकुलातील इयत्ता ५ वी ते १० वी वयोगटातील विशेष विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. पारंपारिक नऊवारी साड्या, धोती, फेटे आणि कपाळावर बुक्का लावून लहानग्या विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या वेशातील बालगोपाळांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हातात भगव्या पताका घेऊन विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असा जयघोष केला.
संकुलातून निघालेली ही दिंडी पिंप्राळा परिसरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. ५ वी ते १० वीच्या या मुलांमधील कलागुणांना, शिस्तीला आणि त्यांच्या उत्साहाला पाहून स्थानिक नागरिक भावूक झाले होते. नागरिकांनी दिंडीचे आणि बालवारकऱ्यांचे जागोजागी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन उत्कर्ष मतिमंद संकुलाचे मुख्याध्यापक श्री. बोरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापकांसह शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षणेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना वारकरी संस्कृतीची माहिती देऊन दिंडीचे नियोजन चोख सांभाळले.
विशेष मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांचा भक्तीभाव यामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी आणि अविस्मरणीय ठरला. सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली.






