इथेनॉल-मिश्रित पेट्रोलविरोधात ‘E20 जनता पार्टी’ची स्थापना; ग्राहक हक्कांसाठी उभारली चळवळ
नवी दिल्ली :
इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (E20) वापराच्या विरोधात ‘E20 जनता पार्टी’ (EJP) या नव्या ग्राहक हक्क चळवळीची स्थापना करण्यात आली आहे. ही कोणतीही राजकीय पक्ष नसून ग्राहकांना इंधन निवडीचा अधिकार मिळावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली चळवळ असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
EJP ने आपल्या प्रमुख मागण्यांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये ग्राहकांना १०० टक्के शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध करून देणे, इंधनावर स्पष्ट आणि पारदर्शक लेबलिंग करणे तसेच इथेनॉल-मिश्रित इंधनाचा वाहनांवर होणारा परिणाम आणि गुणवत्तेबाबत स्वतंत्र अभ्यास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, “आम्ही सरकारकडे कोणतीही सबसिडी किंवा मोफत इंधनाची मागणी करत नाही. ग्राहकांना शुद्ध इंधन निवडण्याचा मूलभूत हक्क मिळावा, हीच आमची मुख्य मागणी आहे.”
देशात टप्प्याटप्प्याने E20 इंधनाचा वापर वाढविण्याचे सरकारचे धोरण असताना, या पार्श्वभूमीवर ग्राहक हक्कांच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या या चळवळीची चर्चा सुरू झाली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






