पेपरफुटी प्रकरणावर MPSC चे पहिले अधिकृत स्पष्टीकरण; पुराव्यांची पडताळणी करून पोलिसांत तक्रार दाखल करणार
मुंबई :
एमपीएससीच्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेचा पेपर परीक्षा होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच फुटल्याचा आरोप उमेदवारांसह आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. या आरोपांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) प्रथमच अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपालकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची आयोगाने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. संबंधितांकडून प्राप्त झालेले पुरावे, निवेदने आणि इतर कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू असून, तपासानंतर संबंधितांविरोधात पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, पेपरफुटीबाबत आयोगाकडे तक्रार करणाऱ्या दोन तक्रारदारांपैकी एका विद्यार्थ्याने आपली तक्रार मागे घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे राज्यभरातील एमपीएससी परीक्षार्थ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून, आयोगाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पेपरफुटीच्या आरोपांबाबत तपासानंतरच सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी




