गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईबाबांना ₹१ कोटींचा सुवर्ण मुकुट अर्पण; आंध्र प्रदेशातील साईभक्ताची अनमोल भेट
शिर्डी : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. या भक्तिमय वातावरणात आंध्र प्रदेशातील साईभक्त मल्लादी श्रीनिवासन राव यांनी साईबाबांच्या चरणी सुमारे ₹१ कोटी बाजारमूल्य असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला.
अर्पण करण्यात आलेल्या या सुवर्ण मुकुटाचे वजन ६४२ ग्रॅम असून त्यावर नवरत्नांची आकर्षक जडणघडण आणि उत्कृष्ट नक्षीकाम करण्यात आले आहे. साईबाबा संस्थानच्या माहितीनुसार, हा मुकुट साईबाबांच्या दैनंदिन अलंकारासाठी वापरण्यात येणार आहे.
मुकुट अर्पण केल्यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने दाते भक्त मल्लादी श्रीनिवासन राव यांचा सन्मान करण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत सर्वत्र भक्तिमय वातावरण असून साईनामाच्या जयघोषात भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी




