पिंपरी-चिंचवडमध्ये दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींवर लैंगिक अत्याचार; ६५ वर्षीय आरोपी अटक
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संतापाची लाट उसळली आहे. १० आणि ४ वर्षांच्या दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रमझान बागवान (वय ६५) याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींचे आई-वडील कामावर गेल्यानंतर आरोपीने गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून दोन्ही चिमुकल्यांवर अत्याचार केले. या प्रकाराची माहिती कुणालाही दिल्यास “पोट कापून टाकीन” अशी धमकी देऊन त्याने मुलींना गप्प बसवले होते.
दरम्यान, मुलींच्या वर्तनातील बदल लक्षात आल्यानंतर शेजारील एका सतर्क महिलेने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तातडीने वाकड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





