पिंपळगाव रेणुकाई जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीत निजामकालीन विटांचा वापर?; RTE उल्लंघनाबाबत चौकशीची मागणी


पिंपळगाव रेणुकाई जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीत निजामकालीन विटांचा वापर?; RTE उल्लंघनाबाबत चौकशीची मागणी

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.दिपाली बेराड यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

पिंपळगाव रेणुकाई, दि. 30 जुलै :
तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकाराचे (RTE) उल्लंघन झाल्याचा आरोप करत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दिपाली कृष्णा बेराड यांनी जिल्हा परिषद, जालना येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सुरक्षित बसण्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना संबंधित गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी (EO) यांनी दिल्या होत्या. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून काम सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून विद्यार्थ्यांचे नियमित व सुरक्षित शिक्षण बाधित होत असून त्यांच्या शैक्षणिक हिताला धक्का बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, सुरू असलेल्या डागडुजीच्या कामासाठी शाळेतील जुन्या निजामकालीन विटांचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या जुन्या विटांच्या वापरामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण कामाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात संबंधित गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी तसेच इतर जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर शासकीय सेवा नियमांनुसार योग्य प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याशिवाय दुरुस्तीचे पुढील काम थांबविण्यात यावे आणि झालेल्या कारवाईचा लेखी अहवाल देण्यात यावा, अशी मागणीही शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दिपाली कृष्णा बेराड यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.

या प्रकरणामुळे शाळेच्या दुरुस्तीच्या कामातील गुणवत्ता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शिक्षणाच्या अधिकाराच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत असून जिल्हा प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे परिसरातील पालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी महेंद्र बेराड


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!