शेत पाणंद रस्त्याअभावी मिरची,भाजीपाला व दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हाल
‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे?’ – सावंगी अवघडराव ग्रामस्थांची शेत पाणंद रस्ते व पिंपळगाव रेणुकाई–सावंगी अवघडराव मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीची आग्रही मागणी
सावंगी अवघडराव, प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील शेतकरी व ग्रामस्थांनी शेत पाणंद रस्त्यांच्या अभावामुळे तसेच पिंपळगाव रेणुकाई–सावंगी अवघडराव मुख्य रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः मिरची, भाजीपाला व दूध उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात पोहोचविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
पावसाळ्यात शेत पाणंद रस्त्यांवर चिखल, पाणी व खड्डे निर्माण होत असल्याने ट्रॅक्टर, दुचाकी व इतर वाहने शेतापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. दूध संकलन करणाऱ्या वाहनांनाही याचा मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व पैसा वाया जात आहे.
दुसरीकडे पिंपळगाव रेणुकाई–सावंगी अवघडराव या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, चिखल व नादुरुस्त अवस्थेमुळे शेतकरी, विद्यार्थी, नागरिक आणि वाहनचालकांना रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
याबाबत हिरालाल तेलंग्रे, शंकर तेलंग्रे, छगन तेलंग्रे, अशोक तेलंग्रे, समाधान तेलंग्रे, सागर तेलंग्रे आदी सावंगी अवघडराव येथील शेतकऱ्यांनी शेत पाणंद रस्त्यांची तातडीने निर्मिती करण्याची आग्रही मागणी केली आहे.
दरम्यान, पारध शाहूराजे येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड यांनीही पारध–पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेत पाणंद रस्त्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे. संबंधित प्रशासन, स्थानिक शेत पाणंद रस्ता समिती आणि लोकप्रतिनिधी यांनी तसेच भोकरदन जाफराबाद मतदार संघाचे आमदार संतोष भाऊ दानवे यांनी त्वरित निर्णय घेऊन सावंगी अवघडराव येथील शेत पानंद रस्त्यासहित मुख्य रस्त्याचे कामे सुरू करावीत. अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
प्रतिनिधी महेंद्र बेराड








