टाकळीभान टेल टॅंक (गोविंद सागर)च्या आउटलेट रॅम्पचे पिलर ढासाळले…
जलसंपदा विभागाने लक्ष घालून तातडीने दुरुस्तीची मागणी
टाकळीभान: (प्रतिनिधी) श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेला टाकळीभान टेल टॅंक (गोविंद सागर) च्या आउटलेट रॅम्प खालील सिमेंट काँक्रीटचा पिलर ढासाळला असून यामुळे आउटलेट रॅम्पला धोका निर्माण झाला आहे. तरी याची जलसंपदा विभागाने लक्ष घालून तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी येथील शेतकरी ग्रामस्थांनी केली आहे.
सविस्तर माहिती अशी की टाकळीभान व परिसरासाठी संजीवनी असलेला टाकळीभान टेल टॅंक (गोविंद सागर) याची निर्मिती १९७२ च्या दुष्काळ मध्ये तालुक्याचे माजी मंत्री स्व. गोविंदरावजी आदिक यांच्या दूरदृष्टीतून व प्रयत्नातून झाली असून यास ५० वर्षे पूर्ण झालेली आहे. सध्या त्याच्या आउटलेट रॅम्प खालील सिमेंट काँक्रीट केलेला पिलर ढासाळला आहे. त्यामुळे या लोखंडी रॅम्पला धोका पोहोचून तो खाली पाण्यात पडण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे आउटलेटचे पाणी सोडण्यासाठी मोठी अडचण उभी राहणार असून या आउटलेट मार्गेच शेतीसाठी पाणी सोडले जाते. टेल टॅंकचा मुख्य उपयोग या आउटलेट मार्फतच होत असून त्याची दुरावस्था झाल्याने या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे जलसंपदा विभागाने गांभीर्याने लक्ष घालून त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच लोकप्रतिनिधी यांनीही या प्रश्नात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी येथील शेतकरी ग्रामस्थांनी केली आहे. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून टेल टॅंक(गोविंद सागर) पिचिंग जवळ अनेक झाडे झुडपे वाढली आहेत. त्याच्याकडेही जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केलेले आहे. तरी श्रीरामपूरच्या पूर्व भागाला वरदान ठरलेला हा जलाशय सुस्थितीत राहावा यासाठी जलसंपदा विभागाने या टेल टॅंक (गोविंद सागर) याच्या देखभालीकडे लक्ष द्यावे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर




