स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकारी पडीत शेतकऱ्यांचा बुलंद आवाज!

टाकळी भान प्रतिनिधी -14 ऑगस्टला भव्य आकारी पडीत शेतकरी व शेतकरी संघटना मेळावा व बेमुदत अन्नत्याग आंदोलन आणि ट्रॅक्टर रॅली. अजितदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली निर्णायक लढा
“जमीन वाटपाची शासकीय अधिसूचना निघेपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही”; शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना ‘पारतंत्र्या’तून मुक्त करावे
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकारी पडीत शेतकऱ्यांचा हक्कासाठीचा आवाज बुलंद होणार आहे. आपल्या पूर्वजांच्या जमिनीचा हक्क मिळण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता निर्णायक लढ्याची घोषणा केली असून, 14 ऑगस्ट रोजी अॅड. अजितदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली हरेगाव शेती महामंडळ ऑफिस समोर भव्य आकारी पडीत शेतकरी मेळावा व बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे .तरीही शेतकरी हिताचा तात्काळ निर्णय झाला नाही तर शेतकर्याचा संयम सुटून कब्जा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
आकारी पडीत जमिनींच्या वाटपाची अधिकृत शासकीय अधिसूचना निघेपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही, असा निर्धार आंदोलनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
“देश स्वतंत्र झाला; मग शेतकरी आपल्या जमिनीच्या हक्कासाठी अजूनही का लढतोय?”
स्वातंत्र्य मिळून दशके उलटली, मात्र आकारी पडीत शेतकरी आजही आपल्या हक्काच्या जमिनीसाठी शासनाच्या दारात संघर्ष करीत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा संघर्ष केवळ जमिनीचा प्रश्न नसून, शेतकऱ्याला त्याच्या हक्कापासून मुक्त करण्याचा प्रश्न बनला आहे, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
अॅड. अजितदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली निर्णायक लढा आकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अॅड. अजितदादा काळे यांनी सातत्याने संघर्ष केला असून, प्रशासनापासून मंत्रालयापर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचविण्यासाठी अथक पाठपुरावा केला आहे.
बैठका, निवेदने, आंदोलने आणि शासनस्तरावरील पाठपुराव्याच्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न सातत्याने जिवंत ठेवला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वतःचा वेळ, श्रम आणि वैयक्तिक सोयी बाजूला ठेवून केलेल्या त्यांच्या संघर्षामुळे आकारी पडीत शेतकऱ्यांमध्ये मोठी संघटनात्मक ताकद निर्माण झाली आहे. पालकमंत्री विखे पाटील यांचे योगदान
या संघर्षाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे. त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत मंत्रालय स्तरावर वेळोवेळी बैठका लावून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर आकारी पडीत शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला.
सकारात्मक प्रतिसाद पुरेसा नाही; आता प्रत्यक्ष अधिसूचना हवी!”
बेमुदत अन्नत्याग आंदोलन 14 ऑगस्टच्या मेळाव्यानंतर सुरू होणाऱ्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनात सहभागी शेतकरी जमीन वाटपाची अधिकृत शासकीय अधिसूचना निघेपर्यंत अन्नत्याग करण्याचा निर्धार व्यक्त करणार आहेत.
आंदोलन शांततामय, लोकशाही व कायदेशीर मार्गाने करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर





