प्रश्नपत्रिकेतील गंभीर त्रुटींमुळे NTAचा मोठा निर्णय; तीन विषयांची पुनर्परीक्षा
नवी दिल्ली : UGC-NET जून २०२६ परीक्षेतील इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) या विषयांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत NTAने तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीच्या तपासणीत प्रश्नपत्रिकांमध्ये तथ्यात्मक, टंकलेखन, भाषांतर आणि व्याकरणाशी संबंधित चुका आढळल्या. तसेच काही प्रश्न यापूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारले गेल्याचेही समितीच्या निदर्शनास आले.
प्रश्नपत्रिकांमधील त्रुटींचे प्रमाण अधिक असल्याने केवळ दुरुस्ती करून परीक्षा प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडणे शक्य नसल्याचा निष्कर्ष तज्ज्ञ समितीने दिला. त्यामुळे उमेदवारांच्या हिताचा विचार करून या तीन विषयांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुनर्परीक्षेचे वेळापत्रक
९ सप्टेंबर २०२६ – इंग्रजी आणि कॉमर्स
१० सप्टेंबर २०२६ – समाजशास्त्र
पुनर्परीक्षेसाठी संबंधित उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. हॉल तिकीट, परीक्षा केंद्र आणि इतर आवश्यक माहिती NTAच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, उर्वरित ८४ विषयांच्या निकाल प्रक्रियेवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे NTAने स्पष्ट केले आहे.
प्रतिनिधी – उमेश कुलकर्णी
लोक1 न्यूज




