ट्रेनमध्ये सीटवरून वाद; RPF कर्मचाऱ्यावर ब्लेडने हल्ल्याचा आरोप, मॉडेलविरोधात गुन्हा
मुंबई : सुरतकडे जाणाऱ्या अरावली एक्स्प्रेसमध्ये सीटवरून झालेल्या वादातून ठाण्यातील ३१ वर्षीय मॉडेल अंतरा सोहम बॅनर्जी हिने RPF कर्मचारी आणि तिकीट तपासणीसावर रेझर ब्लेडने कथितरित्या हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोरीवली शासकीय रेल्वे पोलिसांनी (GRP) तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, तिला अटक केल्यानंतर जामिनावर सोडण्यात आल्याचे वृत्त आहे.
१२ ऑगस्ट रोजी अरावली एक्स्प्रेसमधून अंतरा सोहम बॅनर्जी सुरतकडे जात होती. तिच्याकडे स्लीपर क्लासचे तिकीट असताना ती आरक्षित एसी डब्यात गेल्याचा आरोप आहे. सीटवरून प्रवाशासोबत वाद झाल्यानंतर RPF कर्मचारी आणि तिकीट तपासनीसाने हस्तक्षेप केला. त्यावेळी तिने कथितरित्या रेझर ब्लेड काढून RPF कर्मचाऱ्यावर हल्ला केला तसेच स्वतःलाही दुखापत करून घेतल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद असल्याचे वृत्त आहे.
घटनेनंतर ट्रेन डहाणू स्थानकात पोहोचल्यावर तिला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. १३ ऑगस्ट रोजी बोरीवली GRPने तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेत रेल्वे कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोनही नुकसानग्रस्त झाल्याचे वृत्त आहे.
अभिनेत्रीबाबत महत्त्वाची दुरुस्ती
या प्रकरणात ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील अभिनेत्री अंतरा बॅनर्जीचा सहभाग नाही. काही माध्यमांमध्ये सुरुवातीला तिचे नाव आणि छायाचित्र चुकीने या प्रकरणाशी जोडले गेले होते. अभिनेत्रीच्या टीमने स्पष्ट केले आहे की गुन्ह्यातील आरोपी अंतरा सोहम बॅनर्जी ही वेगळी व्यक्ती असून अभिनेत्री अंतरा सुब्रता बॅनर्जी यांचा या घटनेशी कोणताही संबंध नाही.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया




