अनैतिक संबंधात पती ठरला अडसर; हत्या करून अपघाताचा बनाव, प्रियकर गजाआड
नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करून मृतदेह दुचाकीसह रस्त्यावर टाकत अपघाताचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातील हिंगणा रोड परिसरातील गजानननगर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
मृताचे नाव सुधीर द्विबोदी (३३, रा. गजानननगर, हिंगणा रोड) असे आहे. पोलिसांच्या तपासानुसार, सुधीर यांच्या पत्नीचे आरोपी आशिषकुमार अग्निहोत्री याच्यासोबत कथित अनैतिक संबंध होते. या संबंधात पती अडसर ठरत असल्याने त्याच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.
ठरलेल्या कटानुसार सुधीर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आला. त्यानंतर गळा आवळून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर ही घटना अपघात असल्याचे भासवण्यासाठी मृतदेह दुचाकीसह रस्त्यावर टाकण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात मृत्यू अपघातामुळे नसून मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी आशिषकुमार अग्निहोत्री याला अटक केली. या हत्येमागील नेमका कट आणि त्यात इतर कोणाचा सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, मृताच्या पत्नीच्या भूमिकेबाबतही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असून, या प्रकरणाचा पुढील तपास
एमआयडीसी पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429







