MPSC पदभरतीत ऐतिहासिक अर्ज नोंदणी; ५,७०७ पदांसाठी १२ लाख ६३ हजार उमेदवार
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी विक्रमी अर्ज नोंदणी झाली आहे. तब्बल ५,७०७ पदांसाठी १२ लाख ६३ हजार उमेदवारांनी अर्ज केल्याने आगामी परीक्षेत मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
सुरुवातीला MPSCकडून गट-क सेवेसाठी २,६१९ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर विविध शासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या नवीन मागणीपत्रांनुसार पदसंख्येत आणखी ३,०८८ पदांची वाढ करण्यात आली. त्यामुळे एकूण पदसंख्या आता ५,७०७ वर पोहोचली आहे. या पदांमध्ये तलाठी पदांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
या भरतीसाठी राज्यभरातून १२ लाख ६३ हजार उमेदवारांनी अर्ज केल्याने एका पदासाठी सरासरी २२१ हून अधिक उमेदवारांमध्ये स्पर्धा होणार आहे.
पदसंख्येत झालेली मोठी वाढ आणि विक्रमी अर्जसंख्या यामुळे यंदाची गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आता उमेदवारांचे लक्ष परीक्षेच्या पुढील प्रक्रियेकडे आणि परीक्षेच्या तारखेकडे लागले आहे.
प्रतिनिधी – उमेश कुलकर्णी




