पावत्या फाडूनही आश्वासन पाळले नाही! बदलापुरात हातगाडी तोडल्याने महिला विक्रेती आक्रमक; मनसेच्या अविनाश जाधवांना न्यायासाठी हाक


​पावत्या फाडूनही आश्वासन पाळले नाही! बदलापुरात हातगाडी तोडल्याने महिला विक्रेती आक्रमक; मनसेच्या अविनाश जाधवांना न्यायासाठी हाक
​बदलापूर:

स्थानिक प्रशासनाकडून अतिक्रमणविरोधी कारवाईच्या नावाखाली सुरू असलेल्या मनमानी कारभाराचा आणखी एक संतापजनक प्रकार बदलापूरमध्ये समोर आला आहे. रीतसर पावती फाडून आणि “कारवाई करणार नाही” असे आश्वासन देऊनही प्रशासनाने महिला विक्रेत्याच्या हातगाडीवर थेट हातोडा चालवला आहे. या विश्वासघातामुळे हतबल झालेल्या महिला विक्रेत्याने डोळ्यात अश्रू आणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अविनाश जाधव यांच्याकडे मदतीसाठी आणि न्यायासाठी हाक मारली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर परिसरात उदरनिर्वाह करणाऱ्या महिला विक्रेत्याने प्रशासनाचे रीतसर शुल्क भरून पावत्या फाडल्या होत्या. पावत्या घेतल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी “तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही,” असे स्पष्ट आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने दिलेला शब्द धाब्यावर बसवून अचानक ही कारवाई केली आणि संबंधित महिलेची हातगाडी तोडून टाकली.
​कष्टाने आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करून स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या या महिलेवर प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे मोठी आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. “पावती फाडूनही आणि आश्वासन देऊनही आमची हातगाडी तोडली जात असेल, तर आम्ही प्रशासनावर विश्वास कसा ठेवायचा?” असा संतप्त सवाल या महिलेने उपस्थित केला आहे.
​सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही महिला अत्यंत भावूक होऊन आपली कैफियत मांडताना दिसत आहे. “चोऱ्या करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचे आणि पावती फाडून कष्टाने पोट भरणाऱ्या गरीबांच्या व्यवसायावर असा हातोडा चालवायचा,” अशा शब्दांत नेटकऱ्यांनीही सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
​आश्वासन देऊनही गरिबांवर अन्याय करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार? तसेच मनसे नेते अविनाश जाधव या प्रकरणात हस्तक्षेप करून पीडित महिलेला कसा न्याय व नुकसानभरपाई मिळवून देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!