​बाबू गेनू चौकातील व्यापाऱ्यांचा १६ वर्षांनंतरही विश्वासघात; दगडूशेठ मंदिराच्या विस्तारासाठी मोठ्या जागेचा पर्याय शोधा – हिंदू महासभेची मागणी


​बाबू गेनू चौकातील व्यापाऱ्यांचा १६ वर्षांनंतरही विश्वासघात; दगडूशेठ मंदिराच्या विस्तारासाठी मोठ्या जागेचा पर्याय शोधा – हिंदू महासभेची मागणी

​पुणे:श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी मंदिरामागील विश्रामबाग पोलीस स्टेशनची जागा शासनाने तत्वतः देण्याचे ठरवले असले तरी थोड्याशा जागेत विस्तार करून काहीही फायदा होणार नाही. यापूर्वीही फायर ब्रिगेड (अग्निशामक दल) हलवून मंदिराचा विस्तार करण्यात आला होता, तरीसुद्धा आज ही जागा अपुरी पडत आहे. या परिसरात सध्या गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा उरलेली नाही, तसेच मुख्य बाजारपेठ (मार्केट) असल्याने भविष्यात ही समस्या अधिकच गंभीर होणार आहे. त्यामुळे लहान-सहान विस्तारांऐवजी दगडूशेठ मंदिरासाठी एखाद्या मोठ्या जागेचा पर्याय शोधून तिथेच भव्य विस्तार करावा, जेणेकरून भाविकांची सोय होईल आणि भविष्यात पुन्हा हा प्रश्न उद्भवणार नाही, अशी आक्रमक मागणी अखिल भारत हिंदू महासभेकडून करण्यात आली आहे.
​दुसऱ्या बाजूला, बाबू गेनू मंडळाजवळील जागा महापालिकेने पोलीस स्टेशनसाठी परस्पर राखीव ठेवल्याचा आरोप करत महापालिकेने जुन्या दुकानदारांचा सरळ सरळ विश्वासघात केल्याचा दावा महासभेने केला आहे. व्यापाऱ्यांनी सन २०१० मध्ये ही जागा रिकामी केली होती. तब्बल १६ वर्षे उलटूनही, अनेक वेळा लेखी आश्वासने व लेखी करार करूनसुद्धा महापालिकेने या ठिकाणी व्यापारी संकुल उभारले नाही. उलटपक्षी, ही जागा परस्पर पोलीस स्टेशनकडे वळवण्याचा घाट पालिकेने घातला आहे.
​सदर व्यापारी गाळे रिकामे करताना येथे नवीन व्यापारी संकुल उभारून दुकानदारांना जागा देण्याचे आश्वासन व तसा ठराव स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता. असे असताना ही जागा अन्य कारणासाठी आरक्षित करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे पालिकेने या बाधित व्यापाऱ्यांना आधी योग्य ती नुकसानभरपाई द्यावी आणि मगच पुढील कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
​पत्रकार परिषदेस दुकानदारांच्या वतीने देवेंद्र शर्मा, निलेश अग्रवाल तसेच हिंदू महासभेकडून आनंद दवे,नितीन शुक्ल, उमेश कुलकर्णी, राजेंद्र देशपांडे,अजय कांबळे, सौ. अदिती जोशी व सौ. विद्या घटवाई उपस्थित होते.
​ याआधी फायर स्टेशन हलवून विस्तार करूनही जागा अपुरी पडत आहे.
​मुख्य मार्केटचा परिसर असल्याने सध्या पार्किंगला जागा नाही; भविष्यात ही समस्या अजून वाढेल.
​ मंदिराच्या विस्तारासाठी छोटी जागा न वापरता एकाच वेळी मोठ्या जागेचा पर्याय निवडून भाविकांची सोय करावी.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!