राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला ३० अटींसह परवानगी
पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यातील एसएसपीएम मैदानावर २२ ऑगस्ट रोजी ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी तब्बल ३० अटी व शर्तींसह परवानगी दिली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी विशेष खबरदारी घेण्यात येणार असून मुख्य व्यासपीठाचा परिसर अतिसुरक्षित ठेवण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या परिसरात ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच महिला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत आयोजकांनी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. प्रवेश व्यवस्था, सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि कार्यक्रमस्थळी गर्दीचे व्यवस्थापन याबाबतही आयोजकांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व ३० अटी व शर्तींचे काटेकोर पालन करूनच कार्यक्रमाचे आयोजन करावे लागणार आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी








