केशवनगरमध्ये आठवडे बाजार मैदानावर विसर्जन हौद उभारणीला भाजपचा विरोध; मधुकर बच्चे यांचे प्रशासनाला निवेदन


केशवनगरमध्ये आठवडे बाजार मैदानावर विसर्जन हौद उभारणीला भाजपचा विरोध; मधुकर बच्चे यांचे प्रशासनाला निवेदन
​चिंचवड:
प्रभाग क्रमांक १८, केशवनगर (चिंचवड) येथील आठवडे बाजार मैदानावर गेल्या वर्षी उभारण्यात आलेला गणेश विसर्जन हौद हा जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणारा होता, असा आरोप करत या वर्षी तेथे पुन्हा हौद उभारण्यास भारतीय जनता पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांनी क्षेत्रीय अधिकारी तसेच प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
​गेल्या वर्षी या ठिकाणी हौदाची कोणतीही आवश्यकता नसताना आणि नागरिकांची किंवा गणेशभक्तांची कोणतीही मागणी नसताना हा हौद तयार करण्यात आला, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. केशवनगरमधील विवेक वसाहत येथे आधीपासूनच उत्तम गणेश विसर्जन घाट उपलब्ध आहे. तेथे एक कायमस्वरूपी हौद असून विसर्जन काळात आणखी एका हौदाची सोय केली जाते. प्रशासनाने गरज असल्यास तेथेच दुसऱ्या हौदाची व्यवस्था करावी, परंतु आठवडे बाजार मैदानावर नाहक खर्च करू नये, अशी मागणी बच्चे यांनी केली आहे.
​प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आठवडे बाजार मैदानावर विसर्जन हौद उभारू नये; अन्यथा प्रभागातील नागरिक स्वतःहून रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील, असा इशाराही भाजप महामंत्र्यांनी दिला आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 982254829


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!